Book an Appointment

लहान मुलांची त्वचा थोडी वेगळी असते,बाळा प्रमाणेच कोमल आणि निरागस असते. आजकालच्या नवीन पिढीच्या बाळांची त्वचा जास्त नाजूक, नवीन पिढीच्या आया Google वा इतर माहितीमुळे अधिक (?)ज्ञानी , उत्सुक, व आजी झालेल्या बायका माहिती व उपदेश देण्यास सज्ज! या सगळ्यामध्ये बाळाच्या काळजी विषयी बरेच समज – गैरसमज, वाद- विवाद निर्माण होतात.

माझ्या समोर बसली होती नीता, तिचं गोंडस बाळ आणि तिची सासू . नीतानी बरीच बाळांच्या संगोपनाची पुस्तकं वाचली होती. सासूबाईंनी तिला, त्यांच्या अनुभवानुसार ३ महिन्याच्या बाळाला डाळीच्या व मसुरीच्या पिठानी घासून अंघोळ घालायला सांगितली. बाळाच्या त्वचेला पूर्ण रँश आली त्वचा रुक्ष आणि अतिशय कोरडी पडली. अंगावर बऱ्याच ठिकाणी लाल चट्टे आले. बाळाला खाज येऊन ते रडत होतं, आई आणि आजीला हे काय झालं आमचं बाळ कसं भयंकर दिसतय( त्यांच्या शब्दात, माझ्या नव्हे) याचं रडू येत होतं. यात चूक कोणाचीच नाही कारण आजीने सुद्धा त्यांच्या जमान्यात जे करायचे तेच सल्ले दिले होते, त्यात बरोबर चूक असे नाही.

पण हे निश्चित की आजच्या मुलांची त्वचा जास्त सेन्सिटिव्ह आहे. बरेच “first world skin problems” त्यांना होत आहेत.
तेव्हा आपल्या बाळाला काय लावलं पाहिजे, त्वचेची काय काळजी घ्यायला पाहिजे याची व्याख्या बदलत आहे.

पहिल्या वर्षी बाळाच्या त्वचेचीपूर्ण वाढ झाली नसते. हवामानात होणारे बदल, आईच्या दुधात होणारे बदल, वरून खायला घातलेले पदार्थ ( गाईचे दूध ,पावडरचे दूध किंवा ६ महिन्यानंतरचा आहार ), अंगाला लावलेले प्रॉडक्ट, दागिने व कपडे या सर्व गोष्टींचा बाळाच्या त्वचेवर परिणाम होत असतो.

आपल्या नवीन मातांचा आहार खूप बदलला आहे, पाश्चिमात्य आहारावर थोड्या प्रमाणात गेला आहे आणि त्यामुळे नवीन बाळांना पण थोडे वेस्टर्न प्रॉब्लेम्स जास्त यायला लागले आहेत. हे अलरजी चे प्रकार आता खूप जास्त प्रमाणात दिसतात.

आणखी एक गोष्ट आया विचारतात ते म्हणजे आमच्या बाळाचा रंग बदलला! बाळ जन्मतास सगळेच गोरे असतात कारण तेव्हा रंग बनवणाऱ्या पेशी पूर्ण काम करत नसतात. ३ महिन्यांनंतर या पेशी काम करायला लागतात आणि बाळाचा मूळ रंग येतो. कृपया बाळ गोरे होण्यासाठी त्याला कुठलेही फनेस क्रीम लावू नका.

१)बाळांना होणारे ६०% त्वचारोग खूप काळजी करण्यासारखे नसतात .त्यात घामोळे , डास किवा किडे चावून येणारे फोड, अगदी तान्ह्या मुलांनासुद्धा मुरुम येतात आईच्या दुधातून येणाऱ्या हॉर्मोन्स मुळे.
२) २०-३०% राशेस अशा आहेत की ज्यांच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डायपर रँश- लघवी व संडासच्या जागी लाल चुटक येणारे पुरळ, तिथे फोड येणे अथवा चिघळल्या सारखे वाटणे,
Atopic dermatitis, एक प्रकारची ऍलर्जी, कोरडी त्वचा.
३) १०% पुरळ असे असतात की ज्या साठी त्वरित डॉक्टरला गाठलेच पाहिजे. पुरळाबरोबर ताप येणे, पाणी भरलेले फोड येणे.

काय करावे:
१) उन्हाळ्यात बाळाला दिवसाआड अंघोळ घालावी किंवा रोज अंग पुसून घ्यावे. अंघोळ बाळाच्या साबणाचा फेस करून घालावी .अंघोळीनंतर लगेच दोन तीन मिनिटांनी मॉइश्चरायझर लावावे. पेराबेन नसलेले मॉइश्चरायझर निवडावे.
२) अंघोळी आधी बाळाला खोबरेल तेलाने मसाज करावा. १००% extra virgin coconut oil सर्वात उत्तम. मसाज किवा मालिश खूप जोरात हात पाय न ओढता करावे . मी आयांना सांगते की शक्यतो तुम्ही स्वतःच करत जा ,विशेषतः आता कोरोनाच्या काळात. यामुळे आई आणि बाळाची जवळीक पण वाढते.
३) बाळाला डायपर वापरत असल्यास दिवसातून १-२ तास तरी डायपर काढून मोकळे ठेवावे. डायपर लावायच्या आधी पुरळ होऊ नये म्हणून खास क्रीम्स येतात ती लावावीत. ती जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
४) उन्हाळ्यात, ३ महिन्यापेक्षा मोठ्या बाळांना पोटावर पण ठेवावे. सारखं गुंडाळून ठेऊ नये. यानी घामोळ्या कमी होतात.

काय करू नका:
१) डाळीचे अथवा कोणतेही पीठ बाळाला लावू नये.
२) पहिल्यांदा अन्न देताना एक एक पदार्थाने सुरुवात करावी. जसे एका आठवड्यात एकच भाजी किवा फळ. यामुळे बाळाला कशाची अलर्जी आहे का हे ओळखता येते. खाण्यातून होणाऱ्या अलर्जीचे प्रमाण पूर्वीच्या मनाने खूपच वाढले आहे.
आपल्याकडे बाळाला चाटण , घुटी द्यायची पद्धत आहे, ती पण टाळावी. शक्यतो एक एक पदार्थच द्यावा.
अंडी , दाणे, नट्स, नॉन व्हेज किंवा फॉर्म्युला फूड हे अलर्जीला कारणीभूत काही पदार्थ आहेत.
३) ज्या बाळाला अलर्जी आहे किंवा त्वचा कोरडी आहे त्या बाळाला कुठल्याही प्रकारचे दागिने घालू नयेत.
दागिने ओले राहतात, त्यावर जंतू जमतात आणि बाळाला इन्फेक्शन किंवा अलर्जी होऊ शकते.
४) डोळ्यात काजळ घालू नका. एक तर आपण पुन्हा पुन्हा त्या डबीत बोट घालतो आणि ते बाळाच्या डोळ्यात घालतो. हे स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य नाही. नेहमी आणि विशेषतः आता कोरोनाच्या काळात हे टाळा.
५) एकच डायपर खूप वेळ ठेऊ नका .दर ४-६ तासांनी ते बदला.
६) लोकरीचे कपडे घालू नका. आपल्याकडे बाळ आणि लोकर हे एकत्रच जातात नाही? खरे तर आपल्या हवामानाला लोकरीचे कपडे योग्य नाहीत. लोकर टोचते, त्यात static होते, धूळ बसते आणि आजकाल लोकर सिंथेटिक पण असते.
७) एक वर्षापेक्षा मोठ्या मुलींना अलर्जीचा त्रास असेल तर त्यांना सिंथेटिक कपडे घालू नका.
८) घरातील व्यक्तींना काही त्वचारोग झाला असेल जसे की नायटा ,फंगल इन्फेक्शन तर उपचार करून घ्या.

माझं बरचसं काम नवीन आया आणि त्यांच्या घरच्यांना समजविण्याचे असते, की हे ठीक होईल, याचे डाग राहणार नाहीत !
बाळाच्या अंगावर काहीही उठलं तरी आपल्याला काळजी वाटतेच, कारण ते दर्शनीय असते. डॉक्टरच्या सल्ल्याने नेमके काय झाले आहे ते कळते आणि निश्चिंत पण वाटते.